कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास शिक्षक परिषदेच्यावतीने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्व इतिहास शिक्षकांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. करवीरचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार  होते. तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेच्या उपाध्यक्ष स्मिता जयकर होत्या.

ही परिषद कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुगल मीटवर घेण्यात आली. यावेळी विश्वास सुतार यांनी, नव्या शिक्षण प्रणालीच्या अनुषंगाने इतिहास शिक्षकांची बदलती भूमिका विस्तृतपणे विशद केली. तसेच या परिषदेच्या कार्याचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन इतिहास परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील शिंदे यांनी, शिक्षक दिनाबद्दल माहिती देऊन इतिहास परिषदेच्या भविष्यातील आश्वासक उपक्रमांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी कोल्हापूर विभाग इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. प्रताप पाटील, उपाध्यक्ष प्रा. जितेंद्र जगदाळे, इतिहास परिषदेचे सचिव प्रा. निशांत गोंधळी, राज्य कार्यकारिणीमधील सदस्य प्रा. बाळासाहेब चावरे, सहसचिव प्रा. राजेंद्र कोळेकर, पदाधिकारी, सदस्य, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.