कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी खा. किरीट सोमय्या हे उद्या (मंगळवार) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आली होती. उद्या (दि. २८) सप्टेंबर रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (५) अन्वये जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी डॉ. किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदीबाबतचा पारीत केलेला आदेश रद्द केला आहे.

डॉ. किरीट सोमय्यांच्या दौऱ्यावेळी संबंधित राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून विरोध होणार नाही, याबाबत कागल पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व मुरगुड पोलीस ठाणे यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच पो.नि. जिल्हा विशेष शाखेकडील गोपनीय अहवालावरुन सोमय्या यांच्या उद्या होणाऱ्या दौऱ्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही. तसेच सोमय्यांनी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांचे पालन करुन दौरा कार्यक्रम करणार असल्याबाबत प्रशासनाकडे स्पष्ट केले आहे.