कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ ते आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात ११ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ३३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २०९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ५,  हातकणंगले तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा एकूण ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९,२६७ वर पोहोचली असून आतापर्यंत ४७,४०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर १६९१ जणांचा मृत्यू झाला असून सध्या १७१ जणांवर उपचार सुरू आहेत.