महिला फुटबॉल खेळाडूंना कोल्हापूर सिटी हक्काचे व्यासपीठ : मधुरिमाराजे छत्रपती

0
18

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महिला फुटबॉल खेळाडूंना फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी हक्काचे व्यासपीठ आहे. असे मत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, महिला समितीच्या अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. त्या फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटीच्या सिनिअर महिला संघाच्या निवड चाचणी, सराव शिबीराच्या उद्घाटनावेळी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. चंद्रकांत जाधव होते.

मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या की, महिलांना आज सर्व क्षेत्रे खुली झाली आहेत. त्यातच अनेक महिला खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यातून जनजागृती होऊन महिला मोठ्या संख्येने खेळांकडे वळू लागल्याचे दिसत आहे. या महिला खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन द्यायला हवे आणि फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी हे काम सातत्याने करीत आहे.

आ. चंद्रकांत जाधव म्हणाले की, राज्य आणि राष्ट्रीय इंडियन वुमन्स लीग लुधियाना व बेंगलोर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी संघाने नावलौकीक मिळवला आहे. यापुढील स्पर्धेत खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून, फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी संघाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन आ. जाधव यांनी केले.

विफा वुमन्स फुटबॉल लीग २०२१-२२ या स्पर्धेसाठी इंडीयन वुमन्स लीग पात्रता फेरी करीता महिलांचा संघ निवडला जाणार आहे. निवड चाचणी व सराव शिबीरात कोल्हापूर, मुंबई, पुणे, बुलढाणा, जळगावसह राज्यातील विविध क्लबचे खेळाडू सहभागी झालेत.

यावेळी माजी नगरसेवक संभाजी जाधव, केएसएचे फुटबॉल सेक्रेटरी प्रा. अमर सासणे, मैत्री मुनीश्वर, रणजीत जाधव, दिपक चोरगे, नरेंद्र पायमल, क्रिडा शिक्षक सुभाष पोवार, प्रदिप साळोखे, अमित पवार, युवराज पाटील, प्रमोद भोसले आदी उपस्थित होते.