कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन करणारच असा विश्वास आ. चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला. ते हद्दवाढ समन्वय सर्वपक्षीय कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी कोल्हापूर शहराची रखडलेली हद्दवाढ करण्यासाठी आ. जाधव यांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह हद्दवाढ कृती समितीने यावेळी धरला.

आ. चंद्रकांत जाधव म्हणाले, एक आमदार म्हणून शहराची हद्दवाढ करणे ही माझी जबाबदारी आहे. शहराची हद्दवाढ करायचीच या अनुषंगाने सातत्याने प्रयत्नशील आहे. गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेच्या विविध विभागांच्या बैठका सुरू असून या बैठकीतून महापालिकेचे सर्व विभाग स्वयंपूर्ण परिपूर्ण झाले पाहिजेत यासाठी प्रयत्नशील आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला सर्व मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ रखडली आहे.

तसेच हद्दवाढीबाबत आता परिस्थिती बदललेली आहे. शहराच्या हद्दवाढीला कोणाचाही विरोध नाही. यामुळे पालकमंत्री सतेज पाटील, ना. हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना एकत्रित घेऊन शहराच्या हद्दवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. शहराची हद्दवाढ ही दोन टप्प्यांमध्ये करावी लागणार आहे. सुरुवातीस शहराची लोकसंख्या दहा लाखाच्या पुढे जाईल या अनुषंगाने गावांचा समावेश करून शहराच्या हद्दवाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. जाधव यांनी सांगितले.

आर. के. पवार म्हणाले की, शहराची हद्दवाढ ही झालीच पाहिजे. आता नाही तर कधीच नाही, अशी अवस्था होणार असल्याने हद्दवाढ काळाची गरज आहे. यामुळे हद्दवाढ करण्यासाठी शहराचे आमदार म्हणून आ. जाधव यांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले. त्यामुळे आधी हद्दवाढ नंतर निवडणूक अशी भूमिका कृती समितीने यावेळी मांडली.

यावेळी बाबा पार्टे, सुनील देसाई, सुभाष जाधव, दुर्गेश लिंग्रस, किशोर घाटगे, संजय जाधव, कमलाकर जगदाळे, श्रीकांत माने, विवेक कोरडे, चंद्रकांत बराले, अशोक भंडारे, सुनील पाटील, दिलीप देसाई, विजय शिंदे, अनूप पाटील आदी उपस्थित होते.