मुंबई (प्रतिनिधी) : युनिलिव्हरच्या मुख्य मानव संसाधन अधिकारीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय वंशाच्या लीना नायर यांची लंडनमधील फ्रेंच लक्झरी समूह शनेलने ग्लोबल सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. लीना नायर या मूळच्या  कोल्हापूरच्या असून त्यांचे शालेय शिक्षण होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले आहे. त्यांच्या निवडीमुळे भारतीयांच्या शिरेपचात आणखी एक मानाचा तुराचा खोवला गेला आहे.

१९६९ मध्ये जन्मलेल्या लीना नायर यांनी झारखंडमधील जमशेदपूर येथील झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट   येथून १९९२ मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. तेथे त्यांनी सुवर्णपदकही जिंकले होते. त्यानंतर त्यांनी ग्लोबल कंझ्युमर गुड्स कंपनीत जवळपास ३० वर्ष काम केले.

लीना नायर २०१३ मध्ये भारतातून लंडनला गेल्या होत्या. त्या वेळी त्यांना अँग्लो-डच कंपनीच्या लंडन मुख्यालयात नेतृत्व आणि संघटना विकासाच्या जागतिक उपाध्यक्ष बनवण्यात आले. २०१६ मध्ये त्या युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण सीएचआरओ बनल्या.