वारणानगर (प्रतिनिधी) : वारणा नदीवरील कोडोली – चिकुर्डे पुलावरून आईने मुलीसह उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार (दि. २४) रात्री उशीरा ही घटना घडली. दरम्यान, ऐतवडे खुर्द ता. वाळवा हद्दीत आईचा मृतदेह आज सकाळी सापडला. तर दुपारी चारच्या सुमारास मुलगी रुद्रा हीचा मृतदेह नदीपात्रात ऐतवडे खुर्द (ता. वाळवा ) हद्दीत सापडला. पतीचे निधन आणि मुलीचा मतिमंदपणा यातून आलेल्या नैराश्यातून रेश्माने मुलीसह आत्महत्या केल्याचे तिने लिहीलेल्या चिठ्ठीवरुन स्पष्ट झाले आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, कोडोली येथील रेश्मा आणि तिच्या पतीने चार महिन्याची रुद्रा ही मुलगी दत्तक घेतली होती. परंतु, दहा महिन्यानंतर ती मतिमंद असल्याचे त्यांना समजले होते. तरीही त्यांनी तिचा लळा लागल्याने तिचा चांगला सांभाळ केला होता. रेश्मा ही कोडोली येथील खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. रेश्माच्या पतीचे दीड दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. दत्तक घेतलेली मुलगी रुद्रा ही मातीमंद आणि पतीचे निधन त्यामुळे ती अस्वस्थ होती. रेश्मा आपल्या मुलीसह काल रात्री उशीरा वारणा नदीवर आत्महत्या करायला गेल्या होत्या. तिथे असणाऱ्या मच्छीमार आणि अन्य एका तरुणाने सुमारे दोन तास त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून परत पाठवल्याचे समजते.

त्यानंतर रात्री उशिरा तिने मुलीसह नदी पत्रात उडी घेतल्याचे काही नागरिकांनी बघितले. त्यांनी ही बाब कोडोली पोलिसांना कळवली असता अंधार असल्याने त्यांचा शोध घेता आला नाही. आज (बुधवार) सकाळी घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सपोनि. दिनेश काशीद, फौजदार नरेद्र पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे सपोनि. दिपक जाधव, कर्मचारी, तलाठी अनिल पोवार आपत्ती व्यवस्थेत मदत करणारे तरूण, गनिमी कावा ग्रुपचे कार्यकर्ते यांच्या सयुक्तपणे कोडोली ग्रामपंचायतीच्या आपत्कालीन बोटीने शोध घेण्याचे काम सुरू केले होते. त्यांना आज सकाळी आई रेश्मा हिचा तर तर दुपारी चारच्या सुमारास मुलगी रुद्रा हीचा मृतदेह नदीपात्रात ऐतवडे खुर्द (ता. वाळवा ) हद्दीत सापडला.