इचलकरंजी येथे युवकावर चाकू हल्ला : चौघांना पोलीस कोठडी

0
44

इचलकरंजी (प्रतिनिधी) : मुलीची छेड काढल्याबाबतचा जाब विचारल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार सलमान नदाफ याने अफान मानकर याच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना काल (सोमवार) घडली होती. गावभाग पोलिसांनी नदाफ याच्यासह चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याच गुन्ह्यातील आणखी चार संशयीतांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

इचलकरंजी येथील एका खासगी क्लासमध्ये अफान सलीम मानकर (वय १९, रा. निरामय हॉस्पिटल जवळ) आणि त्याचा मित्र सुहास बालाजी फराकटे (वय १९, रा. पोस्ट ऑफिसजवळ) हे शिक्षण घेतात. काल हे दोघे सुंदर बाग परिसरात नाष्टा करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांच्याच क्लासमधील काही मुली त्याठिकाणी आल्या असता सलमान राजु नदाफ (वय २३, रा. जगताप तालीम जवळ) आणि त्याच्या साथीदारानं त्या मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मानकर आणि फराकटे यांनी सलमान नदाफ याला जाब विचारला. यावेळी नदाफ याने मानकर याच्या कंबरेवर चाकुने वार करून गंभीर जखमी केले. तर नागेश शिवाप्पा हिरेकुरबर (वय २०, रा. बिग बझारजवळ), सौरभ शिवाजी ढोले (वय २३, रा. आंबी गल्ली) या दोघांनी मारहाण केली. तसेच सुरज वसंत बन्ने (वय २७, रा. गावभाग) याने खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेतले.

याच गुन्ह्यात संशयीतांना मदत करणार्‍या अंकुश महादेव कुल्लोळी (वय १९, रा. गावभाग), सलमान शहेनशाह मुजावर (वय २०, रा. शिरढोण, ता. शिरोळ), सुमित अविनाश जाधव (वय २१, रा. टाकवडे, ता. शिरोळ) आणि सौरभ सुशील पाटील (वय १९, रा. गावभाग) या चौघांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.