कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘नो मास्क नो एन्ट्री’ या उपक्रमांतर्गत मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांचे स्वागत मोफत मास्क आणि गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पध्दतीने करण्याचा अनोखा उपक्रम महापालिकेने आज (शनिवार) शहरात राबवला. यासाठी चेंबर ऑफ कॉमर्ससह विविध व्यापारी असोसिएशनच्या सहकार्य लाभले. यावेळी नागरिकांना यापुढे कायम मास्क लावण्याचा सल्लाही देण्यात आला. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने ‘नो मास्क नो एन्ट्री’ ही मोहीम गतिमान केली आहे. मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा यासाठी जनजागृती मोठया प्रमाणात होऊनही काही कित्येक नागरिक विनामास्क रस्त्यावरुन फिरताना आढळतात. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, चेंबर ऑफ कॉमर्स, महाव्दाररोड व्यापारी असोशिएशन, कापड व्यापारी संघ यांच्या सहकार्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई न करता त्यांची गांधीगिरी पध्दतीने अभिनव उपक्रम राबविला.

बिनखांबी गणेश मंदीर परिसरात अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, नगरसेवक तौफिक मुलानी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सहाय्यक आयुक्त संदिप घार्गे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव यांच्या हस्ते विनामास्क फिरणाऱ्यांना मोफत मास्क आणि गुलाबपुष्प्‍ देण्यात आले. या ‘गांधीगिरी’मुळे शहरात सर्वजण या पुढील काळात मास्क वापरुन ‘प्रशासनास सहकार्य करतील अशी अपेक्षा देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.