शिरोलीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत महापालिकेची परिचारिका जागीच ठार…

0
380

टोप (प्रतिनिधी) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बुधले मंगल कार्यालयाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत परिचारिकेचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक्षा मिणचेकर (वय ४५, लालबहादूर हौसिंग सोसायटी माळवाडी, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव असून हा अपघात आज (शुक्रवार) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडला. शिरोली एमआयडीसी पोलिसांत याची नोंद झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक्षा मिणचेकर या कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागात  परिचारिका म्हणून काम करीत होत्या. आज पावणेदहाच्या सुमारास त्या काम उरकून घरी येत असता बुधले मंगल कार्यालयाजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोराची होती की, त्यांचे अवयव रस्त्यावर विखुरले गेले होते. यामुळे त्यांची ओळख पटणे मुश्कील झाले होते. यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या अपघाताचे वृत्त समजताच शिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात वाहतूक सुरळीत केली.