कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरामध्ये १५ ऑगस्ट रोजी डेल्टा प्लसचे तीन रुग्ण आढळले. यामध्ये विचारे माळ, साने गुरुजी वसाहत आणि राजोपाध्येनगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे. या परिसरात महापालिकेतर्फे खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत, योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता नियमांचे पालन करीत व्यवहार पार पाडावेत, घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.  

पत्रकात म्हटले आहे की, वरील उल्लेखित तिन्ही रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पॉझिटिव्ह आलेले होते. सध्या तिन्ही रुग्णांचे प्रकृती व्यवस्थित असून यातील दोन रुग्णांचा लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झालेला आहे. विचारे माळ येथील पेशंट ६२ वर्षांचे असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासली होती.

या तिन्ही रुग्णांचे कॉन्टॅक्ट जुलै महिन्यात ट्रेस करून यांची आरटीपीसीआर चाचणी करणेत आली होती. यातील प्रत्येकी एक असे तीन कॉन्टॅक्ट पॉझिटिव्ह आले होते आणि सध्या या सर्वांची आरोग्याची स्थिती चांगली आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण सुरू आहे. नागरिकांनी कोरोनाविषयक नियम पाळावेत, मास्क आणि सॅनिटायझर यांचा वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जाता, कसल्याही अफवांवर विश्वास न ठेवू नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.