नवी दिल्ली : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण त्यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता गुन्ह्याची नोंद होण्याची शक्यता आहे. इंदुरीकर महाराज यांनी पुत्रप्राप्तीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर प्रथम वर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यानंतर सत्र न्यायालयाकडून हा आदेश रद्द करण्यात आला होता. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जावून पोहोचले होते. याच प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टाकडून महत्त्वाचा निकाल देण्यात आला आहे.
इंदुरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ते गर्भलिंग निदान जाहिरात करत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणावर त्यांना पीसीपीएनडीटी सल्लागार समितीने नोटीस पाठवून इंदुरीकरांकडून या प्रकरणावर खुलासा मागविला. तसेच, त्यांच्यावर प्रथम वर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यानंतर सत्र न्यायालयाकडून हा आदेश रद्द करण्यात आला होता. परंतु सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात ॲड. रंजना गवांदे यांनी ॲड. जितेंद्र पाटील व ॲड. नेहा कांबळे आव्हान दिले.
या प्रकरणावर औरंगाबाद खंडपीठाने निकाल देत प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवला तर सत्र न्यायालयाकडून देण्यात आलेला निकाल रद्द केला. पण औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाला इंदुरीकर महाराज यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली. याच याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली असून न्यायालयाकडून इंदुरीकर महाराजांची याचिका फेटाळून लावत औरंगाबाद खंडपीठाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे आता लवकरच इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.