कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या बदनामीबद्दल कोल्हापूरसह इचलकरंजी, हातकणंगले, कागल, मुरगुड, बिद्री, खडकेवाडा येथे निषेध व्यक्त करण्यात आला.

आज (सोमवार) कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यामध्ये जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार, सरचिटणीस राजेश लाटकर, आदिल फरास आदी उपस्थित होते.

इचलकरंजीमध्ये अमित गाताडे, निहाल कलावंत, नितीन जांभळे, मदन कारंडे आदी कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या पोस्टरला जोडा मारो आंदोलन केले.

कागलमध्ये छ. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मंत्री मुश्रीफ यांच्या विजयाच्या तर सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच दावणे गल्ली परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यामध्ये शहराध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक उपनगराध्यक्ष विवेक लोटे, पक्षप्रतोद नितीन दिंडे, पंकज खलिफ, आनंदा पसारे आदी  उपस्थित होते.

खडकेवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल तालुका अध्यक्ष विकास पाटील, यांच्या नेतृत्वाखाली मयुर आवळेकर, संदीप खोत,रघुनाथ अस्वले, अमोल मंडलिक आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली. आणि कागल-मुरगुड-निपाणी मार्गावर रास्ता रोको केले.

गडहिंग्लजमध्ये जि.प.चे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील गिजवणेकर,माजी नगराध्यक्ष किरण आण्णा कदम, शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, महेश चलवादे गुंडेराव पाटील आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. तसेच पुतळ्याचे दहन करत निषेधाच्या घोषणा दिल्या.

मुरगूडमध्ये शहराध्यक्ष रणजीत सुर्यवंशी, सत्यजित पाटील, सुधीर सावर्डेकर, राहुल वंडकर, रवी परीट, रणजित भारमल, निवृत्ती हासबे आदी कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

बिद्री-बोरवडे येथे बिद्री साखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे, जि.प. सदस्य मनोज फराकटे, सोनाळीचे डी. एम. चौगुले, प्रवीण पाटील आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोमय्या यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

जयसिंगपूर येथेही राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या पुतळ्याला जोडा मारो आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी अण्णासाहेब कावणे, संभाजी मोरे, मुनीर शेख, विनायक गायकवाड, अमोल शिंदे, विकी संकपाळ, सागर माने आदी उपस्थित होते.