गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा तसेच साखर कारखान्यामध्ये गैर कारभार झाल्याचा आरोप केला आहे. त्याच्या निषेधार्थ आज (सोमवार) सायंकाळी गडहिंग्लज येथील दसरा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांचा तिरडी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.

यावेळी गडहिंग्लज राष्ट्रवादीचे शहरप्रमुख सिद्धार्थ बन्ने म्हणाले की, ना. हसन मुश्रीफ यांनी गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. ना. मुश्रीफ यांचा साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा घामाच्या पैश्यावर उभारला आहे यांची माहिती किरीट सोमय्यांनी घ्यावी. कोणावरही आरोप करण्यापूर्वी समोरची व्यक्ती कोण आहे हे समजून घ्यावे. आज आम्ही फक्त तिरडी मोर्चा काढतोय उद्या त्याची तिरडी उचलल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा बन्ने यांनी दिला.

यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक हारूण सय्यद, किरण कदम, महेश सलवादे, रमजान अत्तार, गुंड्या पाटील, कार्यकर्ते, महिला आघाडी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.