कोतोली (प्रतिनिधी)  : पन्हाळा तालुक्यातील कोतोली पैकी माळवाडी ते तिरपण दरम्यानच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा आहे की खड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटर नसल्याने सांडपाणी  रस्त्यावरून वाहत असल्यामुळे रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.  तरी तातडीने या रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटर काढून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

पन्हाळा पश्चिम भागातील कोतोली ते कळे हा वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर परिसरातील लोकांची नेहमी वर्दळ असते. काहीजण मोटारसायकल तर काहीजण इतर वाहनांनी प्रवास करत असतात. तसेच परिसरातील ऊस वाहतूक याच रस्त्याने होत असते. या रस्त्याच्या कडेला गटर नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत जाते. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. सांडपाणी निर्गतीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा गटर काढणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी  नागरिकांतून आणि वाहनधारकांतून होत आहे.