मुंबई (प्रतिनिधी) : क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला आज (बुधवार) मुंबई सेशन कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे. गेल्या १३ दिवसांपासून आर्यन खान आर्थररोड जेलमध्येच आहे. मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट या दोघांचाही जामीन नामंजूर झाला आहे. यामुळे या तिघांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.
आर्यन खानला २ ऑक्टोबर एनसीबीने वांद्रे येथील क्रूझवरून अटक केली होती. त्यानंतर आर्यन खान ७ ऑक्टोबर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. १४ ऑक्टोबर रोजी सेशन कोर्टात न्यायाधिशांनी वकीलांची बाजू ऐकल्यानंतर निर्णय सुरक्षित ठेवला होता. त्याअगोदरच्या सुनावणीत एनसीबीने कोर्टाला सांगितले होते की, आर्यन खान २० वर्षांचा असल्यापासून ड्रग्सचं सेवन करत आहे. एनसीबीच म्हणणं होतं की, आर्यनचे इंटरनॅशनल ड्रग पेडलर्ससोबत संबंध होते.
दरम्यान एनसीबीने आर्यन खान आणि डेब्यू अभिनेत्री दरम्यानचे व्हाट्स अॅप् चॅट न्यायालयात सादर केले आहेत. मात्र, ट्विटमध्ये उल्लेख केलेल्या अभिनेत्रीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.