राशिवडे (प्रतिनिधी) : सध्या जिल्ह्यामध्ये मुले पळवणारी टोळी आल्याच्या बातम्या वारंवार कानावर पडत असताना याची खातरजमा करून घेण्याबरोबरच टोळी आल्यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप्स, फोटोज सोशल मीडियावर एकमेकांना पुढे पाठवताना दक्षता घेणे आवशक आहे. अफवांचे पीक अधिक फोफावणार नाही, याची काळजी घेत सतर्कता बाळगली तर अशा घटनांना पायबंद बसेल आणि मुलांबरोबर पालकांची भीती कमी होण्यास मदत होईल, अशी भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.

गेल्या महिनाभरात मुले पळवून नेण्यात येत असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या; पण कुठेही मुले पळवून नेल्याच्या अधिकृत घटना घडल्या नाहीत, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. खुद्द जिल्हा पोलीस प्रमुखांनी अशा बातम्या अफवा असून, यावर विश्वास ठेवू नका, अशा प्रकारची प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. तरी देखील अनेक गावांमधून अशा संशय येण्याजोग्या घटना घडत आहेत.

कुरुंदवाड, हुपरी, वाशी या गावांमधील बातम्या अलीकडे चर्चेत आल्या आहेत. ब्लँकेट विकण्यासाठी परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये वावरत आहेत. त्यांच्यासाठी अनोळखी परिसर, भाषेबद्दलचे अज्ञान आणि जमावाबद्दलची भीती यातून अशा घटना घडत आहेत की काय, अशी शंका येते. पूर्वी अशा काही घटना घडल्या असतील त्याचाच संदर्भ धरून अशा बातम्या पसरल्या जात आहेत. कोल्हापूर शहरात आणि आसपासच्या गावांमध्ये परप्रांतीय मोठ्या संख्येने राहताना दिसत आहेत. विविध वस्तू विक्रीच्या निमित्ताने त्यांनी चांगलेच ठाण मांडले आहे.

मुळात परप्रांतीय जिल्ह्यात प्रवेश करताना त्यांची रीतसर चौकशी केली, तर जिल्ह्यामधील अनेक गुन्हेगारी घटना कमी होण्यास मदत होईल. त्यांना राहण्यासाठी भाड्याने घर देणाऱ्या नागरिकांनी देखील त्यांची रीतसर नोंद ठेवली तरी देखील त्यांच्यावर वचक राहील. कोल्हापूरचा जागरूक नागरिक मात्र व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या मुले पळविणाऱ्या टोळीचे व्हिडिओ क्लिप्स, फोटोज याची अधिक माहिती न घेता पुढे फॉरवर्ड करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे अशी घटना घडली आहे की नाही, जुनी की नवीन आहे याची कसली माहिती मेसेज पुढे पाठवणाऱ्याला सुद्धा नसते.

घटना घडल्यावरच जागृत होण्यापेक्षा नेहमीच सतर्क राहील तर अशा घटना कधीच घडणार नाहीत हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी केलेल्या आवाहनानुसार अशा संशयित घटनेवेळी ११२ क्रमांकावर संपर्क साधावा. प्रशासन मदतीसाठी सज्ज असले तरी स्वतः पालकांनी सतर्क असणे आवश्यक आहेच. शाळा-महाविद्यायामधून मुलांना स्वरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. अनोळखी संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली ओळखण्यासाठी योग्य ते शिक्षण दिले पाहिजे. काही का असेना पण अशा बातम्यांमुळे आता पालक स्वतः मुलांना शाळेत सोडण्यास आणि आणण्यास जात आहेत, ही बाब स्वागतार्ह ठरत आहे.