काबुलमध्ये बनला ‘खुदा गवाह’ : विक्रम गोखलेंनी जागवल्या ‘त्या’ भयंकर आठवणी  

0
23

मुंबई (प्रतिनिधी) : अफगाणिस्तानमध्ये अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली असून तालिबान्यांनी राजधानी काबुलवर कब्जा मिळवला आहे. राष्ट्रध्यक्ष यांच्यासह राजकीय नेत्यांनी देशातून पळ काढला आहे. तर नागरिक जीवाच्या आकांताने देश सोडून जावू लागले आहे. या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले  यांनी काबुलमध्ये केलेल्या एका चित्रपट शुटींगच्या भयंकर आठवणींना उजाळा दिला.  

        

१९९२ मध्ये रिलिज झालेल्या ‘खुदा गवाह’ चित्रपटाची शूटिंग एक महिनाभर अफगाणिस्तानमधील काबुल आणि मजार ए शरीफमध्ये झाली होती. यात अभिनेते विक्रम गोखले यांनी जेलर रणवीर सेठीची भूमिका साकारली होती.

याबाबत विक्रम गोखले म्हणाले की,  आम्ही काबुल एअरपोर्टवर उतरलो होतो. त्यावेळी २४ तास आधी वापरलेली ९० हून अधिक मिसाईल पाहिली होती. शूटिंगच्या वेळी प्रत्येक कलाकाराला हत्यारबंद २  बॉडीगार्ड्स दिले  होते. तर  अफगाणिस्तान सरकारने सुरक्षेचा पूर्ण बंदोबस्त केला होता. तसेच  एका महिन्यासाठी हवाई सुरक्षादेखील पुरवली होती.

अफगाणीस्तानमधील खराब स्थितीमुळे कलाकारांना शूटिंगनंतर बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. पण हॉटेलमध्ये जेवण चांगले नसल्याने धाब्यावर जेवणासाठी जात होतो.  चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या मते फिल्ममधील लुक खरा असावा, यासाठी फिल्मचं शूटिंग युद्धग्रस्त अफगानिस्तान मध्ये केली जावी.  याची माहिती ज्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन यांना कळाली त्यावेळी त्यांनी निर्माते मनोज देसाईंना चांगलंच झोडपले होते.  तसेच माझ्या मुलाला जर काही झाले तर तू भारतात येऊ नकोस, तिकडेच आत्महत्या कर, असे  त्या म्हणाल्या होत्या.