कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा करून विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीवर ठेवणाऱ्या ठाकरे सरकारचा अकरावी प्रवेशाच्या घोळात आता शिष्यवृत्ती परीक्षेतील गोंधळाची भर पडली आहे. खासगी शाळांचे शैक्षणिक शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्याची घोषणाही शिक्षणसम्राटांच्या दबावाखाली गाडली गेली असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता संपुष्टात आणण्याचा चंग आघाडी सरकारने बांधला आहे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.

राहुल चिकोडे यांनी म्हटले आहे की, १७ पासून शाळा सुरू होणार असल्याच्या  आदेशाला स्थगिती दिली, यावरून या सरकारची धरसोड वृत्ती पुन्हा दिसली आहे.  शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे हित खुंटीवर टांगले असून सातत्याने शिक्षणसम्राटांच्या हिताचीच भूमिका घेतली आहे. शाळा सुरू करण्यापासून परीक्षांपर्यंत आणि प्रवेशापासून शिकवण्यांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर न्यायालयाने चपराक लगावल्याखेरील शिक्षण खात्याचा गाडा पुढे सरकतच नाही. दहावी-बारावी परीक्षांचा घोळ सरकारच्या धोरण लकव्यामुळेच वाढला आहे.

राज्यभरातील पाचवी-आठवीचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार असताना मुंबई महापालिकेच्या गरीब होतकरू मुलांना मात्र या परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा चंग सरकारच्या आशीर्वादाने पालिकेने बांधला आहे, असा आरोप करून ते म्हणाले की शिक्षण शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्याच्या आदेशास शिक्षणसंस्था जुमानत नाहीत, उलट सरकारवरच दबाव टाकून माघार घेण्यास भाग पाडतात, यावरून ठाकरे सरकारची हतबलताही स्पष्ट झाली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी मात्र त्रयस्थपणे गंमत पाहात गप्प बसावे, हे आश्चर्यकारक आहे, असेही चिकोडे यांनी म्हटले आहे.