खेबवड्याचे मैदान भारत केसरी पै. प्रवीण भोलाने मारले

0
166

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील खेबवडे येथील श्री विठालाई देवीच्या यात्रेनिमित्त श्री बालभीम तालीम मंडळ व पैलवान सुभाष वाडकर, सुयोग वाडकर यांच्या वतीने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात भारत केसरी पै. प्रवीण भोला याने पुणे महापौर केसरीचा मानकरी पै. गणेश जगताप याला डाव-प्रतिडाव करत झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये ३६ व्या मिनिटाला सिंगल लेल्सन या डावावर चितपट केले.

४१ वर्षांची अखंड परंपरा असलेल्या खेबवडेच्या या मैदानामध्ये १०७ हून अधिक कुस्त्या चटकदार झाल्या. एक नंबरच्या झालेल्या कुस्तीच्या लढतीमध्ये विजयी ठरलेल्या पैलवान प्रवीण भोला याला युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रोख बक्षीस देण्यात आले.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत बानगेच्या पै. अरुण बोंगार्डे याने आमशीच्या संग्राम पाटील याला गदेलोट डावावर पराभूत केले. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कर्नाटक केसरी कार्तिक काटे याने दिल्ली केसरी मनीष कुमार याला कला जंग या डावावर चितपट केले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत बानगेच्या शशिकांत बोंगार्डेने मुंबई महापौर केसरी ओमकार चौगले याला आस्मान दाखवले.

जागतिक विजेता राशिवडेचा पैलवान सौरभ पाटील याने कर्नाटक चॅम्पियन महेश अथणी याला चितपट केले. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सौरभ पाटील याला रोख रक्कम ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले. पैलवान विशाल शेळके याने दऱ्याचे वडगावचा पैलवान कृष्णात कांबळे याला पराभूत केले.

इतर विजयी मल्ल : किरण पाटील, प्रतीक म्हेतर, संकेत पाटील, ओमकार लाड, शुभम पाटील, हर्षद बच्चे, सनी रानमाळे, सतीश कुंभार.

अनिल पाटील आणि सूरज पालकर यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. या कुस्तीच्या मैदानासाठी पंच म्हणून सुभाष वाडकर, बाळू सुतार, तिपुगडे वस्ताद, रामदास लोहार, शिवाजी संकपाळ, विजय चौगले, भैरवनाथ आरेकर यांनी काम पाहिले.

कुस्तीचे समलोचन राजाराम चौगले आणि कृष्णात वाडकर यांनी केले. मैदानावर हलगीसाठी हनुमंत घुले यांनी ताल धरला. या सर्व कुस्त्या पैलवान सुभाष वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आल्या.

यावेळी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज संजय पाटील, युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार के. पी. पाटील. ‘शाहू’चे संचालक संजय नरके, बिद्रीचे संचालक श्रीपती पाटील, अन्नपूर्णा शुगरचे संचालक विश्वासराव दिंडोर्ले, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील, बाबासो चौगले, प्रकाश पाटील, प्रशांत वाडकर, सागर पाटील, अनिल मुळीक, एकनाथ पाटील, गजानन पाटील, युवराज गवळी, मार्केट कमिटी संचालक दिगंबर पाटील, खेबवडेचे सरपंच व उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक, कुस्तीशौकिन उपस्थित होते.