कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नांकडे महाराष्ट्र सरकार आणि जनतेचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने  ३० ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत केली.

ते पुढे म्हणाले की, १९९३ साली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीमाप्रश्न निकालात काढण्यासाठी तोडगा सुचविला होता. परंतु काही नेत्यांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव मागे पडला होता. परंतु सध्याची परिस्थिती पाहता सर्व पक्षीय नेत्यांनी पवार यांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करून प्रश्न मार्गी लावून मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या आंदोलनात कोल्हापूरसह सीमाभागातील मराठी भाषिकांनी, लोकप्रतिनिधींनी सहभागी होण्याचे आवाहनही समितीच्या वतीने  यावेळी करण्यात आले.  यावेळी प्रतापराव सरदेसाई, विशाल पाटील, प्रकाश चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र एकिकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.