मुंबई (प्रातिनिधी) : तुरुंगात आपला विनयभंग आणि मारहाण झाल्याचा दावा मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी १५ मे रोजी अटक केली होती, तर २२ जून रोजी तिची जामिनावर सुटका करण्यात आली. तिने आपली अटक बेकायदेशीर असल्याचेही म्हटले आहे.

अभिनेत्री चितळे म्हणाली, मला कोणत्याही वॉरंट आणि नोटीसशिवाय घरातून बेकायदेशीरपणे उचलण्यात आले. या प्रकणात मी काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे मी त्याचा सामना करू शकले. आपल्या ४१ दिवसांच्या तुरुंगवासाचा संदर्भ देत ती म्हणाली, राष्ट्रवादीच्या महिलांनी मला मारहाण केली. माझ्यावर विषारी काळी शाई फेकण्यात आली, जी माझ्या त्वचेसाठी हानिकारक होती. माझ्यावर रंग आणि अंडीही फेकण्यात आली.

आपल्या पोस्टवर स्पष्टीकरण देताना केतकी म्हणाली की, लोकांनी तिच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला. मी माझ्या पोस्टमध्ये फक्त ‘पवार’ असा उल्लेख केला होता. माझा हेतू कोणाचाही अपमान करण्याचा नव्हता. ज्यांनी माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ लावला, ते शरद पवार असे आहेत असे मानतात का? तसे नसेल, तर मग एफआयआर का करण्यात आली? मी जामिनावर बाहेर आहे. लढा सुरूच आहे, मी आता मुक्त नाही. माझ्यावर २२ गुन्हे दाखल आहेत आणि फक्त एकाला जामीन मिळाला आहे.

केतकी चितळेने सांगितले की, तुरुंगात घालवलेले माझ्या आयुष्यातील ते ४१ दिवस परत येणार नाहीत. मला व्यावसायिक जीवनात अनेक तोट्यांचा सामना करावा लागला. मी सर्व प्रकल्प गमावले. मला भविष्यात काम मिळेल की नाही हे माहीत नाही.