नांदणीतील पंचगंगा नदीपात्रात ‘केंदाळच केंदाळ…’

0
115

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील पंचगंगा नदीपात्रात पाण्यावर केवळ  केंदाळच तरंगताना पहावयास मिळत आहे. पाणी दिसतच नाहीये. हेच पाणी नागरिक, शेतीला पुरवले नागरिकांसह जनावरांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने नदी प्रदूषणासह आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

काही दिवसांपूर्वी दूषित व मैलामिश्रित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीमधील मासे तसेच जलचर प्राणी मृत झाल्याचे आढळून आले. राजकीय व सामाजिक संघटनांनी या विषयी आंदोलने व निवेदने तहसीलदारांना दिली आहेत. पण या निवेदनास केवळ आश्वासनाशिवाय कोणत्याही प्रकारची दाद मिळालेली नाही. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

हेच पाणी परिसरातील शेतीला पुरवले जात असल्याने पाळीव जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न, पिकांचे नुकसान व शेतकऱ्यांच्या अंगाला आग सुटणे अशा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये प्रशासन अधिकाऱ्यांनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. पंचगंगा लवकरात लवकर प्रदूषणमुक्त करावी, अशी मागणी होत आहे.