कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग झाल्याचे वेळीच निदान होऊन रुग्णावर योग्य उपचार झाल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे ताप, सर्दी आणि खोकला यासारखी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन आपली कोरोनाविषयक चाचणी करून घेऊन स्वतःसह कुटुंब सुरक्षित ठेवावे, असे आवाहन आ. चंद्रकांत जाधव यांनी केले.

आ. जाधव म्हणाले की, जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोनाची लक्षणे असलेले अनेक रुग्ण आहेत. मात्र, स्वॅबची तपासणी केली नसल्यामुळे उपचार करण्यावर मर्यादा येत आहेत. रुग्णावर कोविड वॉर्डमध्ये की सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार करायचा असा प्रश्न डॉक्टरांना भेडसावत आहे. अशा परिस्थितीमध्ये उपचार करताना अनेक अडचणी येत आहेत. अनेक रुग्णांचा मृत्यूनंतर कोरोना अहवाल पॉझिटव्ह आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने योग्य वेळी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कोरोचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, सर्दी व खोकला यासारखी लक्षणे दिसून येतात. या आजारावर वेळीच उपचार झाल्यास रुग्ण बरा होतो. त्यामुळे ताप, सर्दी व खोकला अशी लक्षणे असलेल्या प्रत्येक व्यक्तीची कोरोनाविषयक तपासणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी स्वतः पुढे येऊन कोरोनाविषयक तपासणी करून घ्यावी, म्हणजे सहजरीत्या उपचार करता येतील. यामुळे स्वतःबरोबर कुटुंबही सुरक्षित राहील, असा विश्वास आ. जाधव यांनी व्यक्त केला आहे.