धामोड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत  राधानगरी तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विकास सेवा संस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील (कौलवकर) यांनी आज (शुक्रवार) सांगितले. ते ‘लाईव्ह मराठी’शी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, विद्यमान संचालकांना आपण आणि भोगावती परीसरातील माझ्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत प्रामाणिक मदत केली आहे. परंतु यावेळी आपण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. त्यादृष्टीने तयारीही केलेली आहे. उमेदवारी संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले.

राधानगरी तालुक्याचा विचार करता तुळशी, धामणी, दूधगंगा परिसरापेक्षा भोगावती परिसरातील संस्था संख्येने जास्त आहेत. परंतु, गेली अनेक वर्षे या परिसरातील उमेदवाराला केडीसीसी बँकेत संधी मिळालेली नाही. त्यामुळे आपण यावेळी उमेदवारीसाठी ठाम असल्याचे सांगितले. विकास सेवा संस्थेबरोबरच इतर कोट्यातून उमेदवारी मिळाल्यास तीही स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.