कागल (प्रतिनिधी) : केडीसीसी बँक बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. कागलमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज मंजुरीपत्रांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने होते.

मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँकेने निव्वळ शेतीसाठी कर्जपुरवठा करणारी बँक, ही जुनी ओळख कधीच पुसली आहे. सर्वच प्रकारच्या उद्योग व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यामध्ये बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे.

जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने म्हणाले, अण्णासाहेब पाटील योजनेबद्दल आमदार मुश्रीफ यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे पाचशे कोटी रुपये मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसायाभिमुख करण्यासाठी ठेवले आहेत. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार ज्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांना आर्थिक स्थैर्य देऊन व्यवसायाभिमुख करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत सुरू आहे.

निव्वळ व्यवसायासाठी व दूध व्यवसायासाठीसुद्धा म्हशी घेणार असतील, तर त्यासाठी सुद्धा दोन लाख रुपये अण्णासाहेब पाटील मंडळाच्या वतीने देण्याची तरतूद केली आहे. उद्योग, व्यवसाय व रोजगारवाढीच्या दृष्टीने तरुणांनी केडीसीसी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही माने यांनी केले.

नामदेव विठ्ठल मालवेकर (सावर्डे खुर्द), छाया सिध्देश्वर पाटील (म्हाकवे), सचिन गंगाधर सूर्यवंशी (नानीबाई चिखली), सुनील दत्तात्रय अडसुळे (बानगे), मदन संभाजी करडे (चिमगाव) यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज मंजूर झालेली आहेत.