‘केडीसीसी’च्या सभेत टोलेबाजी अन्…

0
107

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील मार्केटयार्ड परिसरातील शाहू सांस्कृतिक सभागृहात झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत जोरदार टोलेबाजी झाली. अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कौतुक करत असताना काही सभासदांनी बँकेच्या वाढलेल्या थकबाकीकडेही लक्ष वेधले.

प्रा. किसनराव कुराडे म्हणाले की, बँकेने अडचणीतील सूतगिरण्यांनाही कर्ज पुरवठा करावा, अशी मागणी लावून धरली. व्यासपीठावर आणि सरकारमध्येही तुम्हीच आहात, त्यामुळे सूतगिरण्यांसाठी काही तरी ठोस करा, असे त्यांनी सांगितले. यावर मुश्रीफ यांनी चांगल्या सूतगिरण्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. यावर प्रा. कुराडे यांनी म्हातारा आहे, म्हणून बापाकडे दुर्लक्ष करणार का असा उपरोधिक टोला लगावला.

सभा सुरू झाल्यानंतर मुश्रीफांचे भाषण सुरू असताना उशिराने आमदार पी. एन. पाटील आले. याचा संदर्भ घेत मुश्रीफ यांनी पी. एन. यांना शंभर वर्ष आयुष्य आहे, अशी टिप्पणी केली. यावर उपस्थित काही सभासदांनी शंभर नव्हे १०६ म्हणा, असा पुकार केला.

सडोली खालसा येथील सभासद निवास बेलेकर यांनी  बँकेची थकबाकी का वाढली, अशी विचारणा केली. सीईओ ए. बी. माने यांनी आजरा साखर कारखाना आणि इचलकरंजीच्या पार्कच्या थकीत कर्जामुळे बँकेची थकबाकी वाढल्याचे सांगितले. आजरा कारखाना सुरू करण्यासाठी निविदा काढली आहे. पुढील वर्षी कारखाना सुरू होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले. थकीत कर्ज असले तरी मालमत्ता तारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.