‘करवीर तहसिल’ला मिळणार सुसज्ज इमारत : महसूल विभागाकडून कोट्यवधींचा निधी मंजूर  

0
87

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील करवीर तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मान्यता दिली आहे. त्याकरिता १४ कोटी ९८ लाख ८२ हजार ४८६ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे करवीर तहसिल कार्यालयास लवकरच सुसज्ज इमारत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिल्याचा शासन निर्णय गुरुवारी घेण्यात आला आहे. यामुळे करवीर तालुक्यातील नागरिकांना सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशी प्रशासकीय इमारत लाभणार आहे. याच इमारतीतील करवीर पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी  ७३ लाख २३ हजार ८९८/- इतका निधी गृह विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी सहकार्य केल्याचे ना. पाटील यांनी सांगीतले.

मागील अनेक वर्षांपासून करवीर तहसिल कार्यालय आणि करवीर पोलीस ठाणे भाऊसिंगजी रोडवरती एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. कार्यालयास देखील खुराड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे सुसज्ज इमारतीमध्ये नवीन तहसिल कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षा पासून केली जात आहे. त्याची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.