कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनीच्या भक्तांनी आवर्जून साजरा करावा असा सण म्हणजेच २६ सप्टेंबर १७१५. मोगलांच्या काळात होणाऱ्या आक्रमणापासून‌ लपवून श्रीपूजकांच्या घरी लपवलेली श्री अंबाबाईची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान करण्यात आली तो हा दिवस.

सन १७१० मध्ये श्रीमन्महाराणी ताराराणी सरकारांनी करवीर संस्थानची स्थापना केली. त्यानंतर १७१५ साली नरहरभट सावगावकर यांना देवीचा दृष्टांत झाला की आता मला पुन्हा सिंहासनावर विराजमान करा. त्यांनी हा दृष्टांत पन्हाळगडावर श्रीमन्महाराज शंभू छत्रपती (२ रे) यांना कथन केला. महाराजांच्या हुकुमावरून श्रीमंत सिदोजी घोरपडे सरकार यांनी २६/९/१७१५ विजया दशमी दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान केली.

यावर्षी या प्रसंगाला ३०५ वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोना संकटामुळे भव्य दिव्य नसला तरी साधा  पण सुंदर सोहळा महालक्ष्मी मंदिरात संपन्न झाला. या निमित्ताने श्रीमंत यशराज घोरपडे यांच्या हस्ते अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, एन.डी. जाधव यांच्या हस्ते घोरपडे सरकार यांचे प्रतिनिधी श्रीमंत यशराज घोरपडे गजेंद्रगडकर, सावगावकर प्रधान यांचे प्रतिनिधी विशाल प्रधान, श्रीपूजक प्रतिनिधी माधव मुनीश्वर, शिरीष मुनीश्वर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ॲड. प्रसन्न मालेकर यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व सांगितले. यानिमित्ताने करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची सालंकृत विशेष पूजा बांधून संपूर्ण मंदिर फुले आणि रांगोळी काढून सजवण्यात आले होते.

यावेळी देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव, मिलिंद घेवारी, सुयश पाटिल गणेश नेर्लेकर-देसाई यांच्यासह देवस्थान समितीचे कर्मचारी, श्रीपूजक उपस्थित होते.