सातारा (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची कराड सत्र न्यायालयाने ऊसदर आंदोलनातील एका खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. शेट्टी आणि खोत यांच्यावर कराड येथील २०१३ मध्ये झालेल्या ऊस दर आंदोलन प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या दोन्ही नेत्यांची खटल्यातून मुक्तता केली असली, तरी कार्यकर्त्यांवरील खटला सुरू ठेवण्यात येणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ऊसदर प्रश्नी २०१३ मध्ये आक्रमक आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रास्ता रोको, टायर जाळणे अशा प्रकारचे आंदोलन केले होते. २०१३ मधील ऊसदर आंदोलनातील ४७ केसेसमधून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र, यातील इतर आंदोलकांवरील खटला सुरूच राहणार आहे.