करवीर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुख यांच्या वाहनावर केलेला भ्याड हल्ला, महाराष्ट्राच्या फलकाची तोडफोड, तसेच मराठी भाषिकांच्या दुकानावरील मराठी फलकाची विटंबना बेळगावामध्ये कन्नड रक्षक वेदिका या संघटनेने केली. या घटनेच्या निषेधार्थ करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगरमध्ये कन्नड फलकांना काळे फासून प्रतिउत्तर देण्यात आले. यावेळी ‘कन्नडिगांचा धिक्कार असो’, ‘कर्नाटकातील भाजप सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

यापुढे दुकानावर कन्नड फलक आढळले, तर संबंधित दुकान मालकाला काळे फासण्याचा इशारा राजू यादव यांनी यावेळी दिला. तसेच पोलिसांनीही तत्काळ असे फलक उतरविण्याच्या नोटीसा संबंधित व्यवसायिकांना द्याव्यात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पोलीस व व्यापारी जबाबदार राहतील, असाही इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

दरम्यान, शिवसैनिकांच्या दणक्याने इतर व्यवसायिकांनी तत्काळ आपले कानडी फलक उतरून सीमाभागातील मराठी भाषिक आणि त्यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.

यावेळी करवीर तालुका उपप्रमुख दीपक पाटील, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, युवा सेनेचे सागर पाटील, संतोष चौगुले, दीपक पोपटाने, दीपक अंकल सुनील वाणी, वीरेंद्र भोपळे, तानाजी राठोड, बाबुराव पाटील, शिवाजी लोहार आदी  शिवसैनिक उपस्थित होते.