नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आज (सोमवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची उपस्थिती होती. पुढील वर्षी गुजरातमध्ये  विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.  

लोकसभा निवडणुकीपूर्वी कन्हैय्याकुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) मध्ये प्रवेश केला होता. बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातून त्यांनी लोकसभा लढवली होती. भाजपचे गिरीराज सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता. तर राष्ट्रीय दलित अधिकार मंच (आरडीएएम) चे संयोजक मेवानी यांनी २०१७ मध्ये गुजरातमधील वडगाम विधानसभा काँग्रेसच्या पाठिंब्याने लढवत जिंकली होती.