पाटणा (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रान उठवणारे भाकपचे नेते कन्हैया कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयाची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. कन्हैया आणि भाकपमध्ये गेल्या काही दिवसांपासून संबंध बिघडले आहेत. त्यामुळे त्यांनी अशोक चौधरी यांची नुकतीच भेट घेतली. त्यामुळे ते डाव्यांची साथ सोडून जेडीयूमध्ये सहभागी होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी भाकपाने कन्हैया कुमार यांच्याविरोधात एक ठराव मंजूर केला होता. त्यानंतर अशोक चौधरी यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी ही भेट अराजकीय असल्याचे म्हटले आहे. दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना ओळखतात, त्यामुळे ही भेट झाल्याचे म्हटले आहे. भाजपकडून या भेटीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राज्यमंत्री सुभाष सिंह यांनी भेटीवर टीका करत कन्हैया कुमारचा उल्लेख मानसिक रुग्ण असा केला असून, अशी भेट अयोग्य असल्याचे म्हटले आहे. या भेटीबाबत जेडीयूचे प्रवक्ते अजय आलोक यांनी सांगितले की, कन्हैया कुमार यांनी त्यांची विकृत विचारसरणी सोडली तर त्यांचे पक्षात स्वागत केले जाईल.