‘कंगना’ला मत व्यक्त करण्याचा अधिकार : बंदीची याचिका फेटाळली

0
71

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री कंगना रणौतला आपली मते व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे,  असे स्पष्ट करून तिच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) फेटाळून लावली.

अली कासिफ खान- देशमुख या व्यक्तीने कंगनाच्या वादग्रस्त ट्विटविरोधात  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली,  मुंबईकरांना ती पप्पू सेना म्हणते,  ती शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी करते,  हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते, असे आरोप करून तिच्या ट्विटरवर बंदी घालण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली होती.

दरम्यान, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. कंगनाला देखील आपली मते व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे.  तसेच तिच्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यासाठी अपेक्षित पुरावे नाहीत. स्वतंत्र भारतात प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अन् तो कंगनाला देखील आहे. पण कंगनाने स्वत:ची भूमिका मांडताना शब्दांचा वापर विचार करुन करावा,  अशी समजही  न्यायालयाने तिला दिली आहे.