मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण : काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेचा इशारा

0
95

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विविध मागण्यांसाठी पाटगाव, फये, तुळशी धरणग्रस्त संलग्न काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्या वतीने आजपासून (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत शासन आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून न्याय देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

दूधगंगा प्रकल्पातील पाण्याच्या पातळीवरच्या बुडीत क्षेत्राबाहेरील जमिनीचा मोबदला मिळावा, दूधगंगा प्रकल्पातील मंजूर नागरी सुविधांना अनुभव मिळून रखडलेली कामे सुरू करण्यात यावीत, वंचित खातेदारांना जमीन मिळावी या काळम्मावाडी धरणग्रस्तांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांसाठी अनेक वर्षे आंदोलने करून मोर्चे काढूनही या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं करण्यात आली.

पाटगाव प्रकल्पातील वंचित धरणग्रस्तांना जमीन मिळावी, फये प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नियमाप्रमाणे गायरानातील जमीन मिळावी, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील अतिक्रमणांना आळा घालावा, कर्ज तुळशी प्रकल्पातील देवस्थान जमिनी बदलून मिळाव्यात याही मागण्या यावेळी करण्यात आल्या. जोपर्यंत शासन आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, बेमुदत उपोषण सुरूच राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

या आंदोलनात काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेचे पदाधिकारी, धरणग्रस्त सहभागी झाले आहेत.