कागल बझार हे महिला उद्योजकांसाठी पहिले व्यासपीठ : समरजितसिंह घाटगे

0
38

कागल (प्रतिनिधी) : कागल बझारच्या रूपाने बचत गटांसह उद्योजक महिलांसाठी कागल तालुक्यातील पहिलेच व्यासपीठ निर्माण झाले आहे.  असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे  यांनी केले. ते शाहू कृषी सोसायटी संचलित कागल बझार डिपार्टमेंटल स्टोअरच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

यावेळी शाहू साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते या बझारचे उद्घाटन करण्यात आले. श्रीमती घाटगे यांच्या हस्ते पाच ग्राहकांना क्रेडिट पासबुकचे वितरणही करण्यात आले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, विक्रमसिंहराजे घाटगे यांनी नेहमी  स्पर्धेच्या युगात एखादी संस्था टिकून राहावयाची असेल तर बदलत्या परिस्थितीचा वेध घेत संस्थेने वेगवेगळे पर्याय शोधले पाहिजेत. ज्यामध्ये संस्थेचे सभासद आणि सर्वसामान्यांचे हित आहे. त्याचेच हे पुढचे पाऊल आहे. कागल बझारच्या माध्यमातून बचतगटांसह उद्योजक महिलांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळून त्यांना आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे सांगितले.

राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी, बचतगटांसह उद्योजक महिलांसमोर त्यांनी उत्पादित केलेली उत्पादने विकायची कुठे याची मोठी समस्या आहे. कागल बझारच्या रूपाने आम्ही उद्योगी महिलांसाठी चांगला पर्याय उभा केला आहे. भविष्यात मुरगुड, गडहिंग्लज आणि जिल्ह्यात याच्या शाखा सुरू करण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शाहू कृषी सोसायटीचे चेअरमन अनंत फर्नांडिस, कार्यकारी संचालक समीर नाळे, शाहू कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, दूधगंगा डेअरीचे चेअरमन अजितसिंह घाटगे, नगरसेवक, नगरसेविका, संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.