यंदा जोतिबाचे खेटे बंदच..!

0
162

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयात कोरोनाची रूग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे वाडीरत्नागिरी येथे रविवारपासून (दि.२८) सुरू होणारे जोतिबाचे खेटे बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जोतिबा मंदिर   खेट्यांच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. इतर दिवशी मंदिर नित्यनियमाने सुरू राहील, असे देवस्थान समितीने पत्रकाद्वारे कळवले आहे.

 

जोतिबा मंदिर खेट्याच्या दिवशी २८ फेब्रुवारी, ७,१४,२१ आणि २८ मार्चला बंद ठेवण्यात येणार आहे. परंतु या दिवशी पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी कमीतकमी मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात येतील. इतर दिवशी मंदिर भाविकांसाठी नित्यनियमाने सुरू राहील, पण भाविकांना मास्क, सॅनिटायझर बंधनकारक असेल. तर सुरक्षित अंतर राखून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येईल, याची नोंद घेऊन भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे.