मुंबई (प्रतिनिधी) :  मुंबईतील राजभवन येथे आज (गुरुवार)  झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. विद्यासागर कानडे यांना राज्याचे लोकायुक्त पदाची शपथ दिली.  न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांचा या पदाचा कार्यकाळ ऑगस्ट २०२० मध्ये संपल्यापासून हे पद रिक्त होते.   

न्या. कानडे यांचा जन्म २२ जून १९५५ रोजी झाला. यांनी सन १९७९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची सुरुवात केली. यांची १२ ऑक्टोबर २००१ रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.  दिनांक २ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१५ या कालावधीत आणि त्यानंतर १५ जानेवारी ते २० जानेवारी २०१६ या कालावधीत ते मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती होते. न्या. कानडे यांनी आपल्या कारकिर्दीत ३४ हजारांपेक्षा जास्त प्रकरणांमध्ये न्यायनिवाडा केला आहे. त्यांनी दिलेले १२०० पेक्षा अधिक निकालांचा विधी अहवालांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सेवाधिकार आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, उपलोकायुक्त संजय भाटिया, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, वरिष्ठ शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.