पत्रकार अमृत मंडलिक यांची मनाला चटका लावणारी एक्झिट…

0
354

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील पत्रकार व नामांकित फुटबॉलपटू अमृत राजाराम मंडलिक (वय ३०, रा. पोवार कॉलनी, पाचगाव ता. करवीर) यांनी आज (सोमवार) घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.

आज सकाळी पत्रकार अमृत यांनी घरात कापडी पट्टीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

अमृत यांनी शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या संवादशास्त्र विभागातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते, त्यानंतर एका वृत्तवाहिनीमध्ये तसेच काही वृत्तपत्रांमध्ये काम केले. काही महिन्यांपासून ते एका चॅनेलमध्ये कोल्हापूर प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. हसऱ्या स्वभावाच्या, मितभाषी अमृत मंडलिक यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे.