मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाविषयी एका किस्सा सांगून पत्रकार परिषदेतील वातावरण खुलविले. तर किस्सा ऐकून  उपस्थित पत्रकार  हास्यकल्लोळात बुडाले.

शरद पवार यांनी सांगितले की, आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे. आमचा सर्वांचा दृष्टिकोन किती व्यापक झाला आहे बघा. जयंत पाटलांच्या चिरंजीवांनी मंगळवारी  संध्याकाळी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केले. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळवली. आता आम्ही वाळवा, इस्लामपूरपर्यंत सीमित राहिलो नाही. आम्ही एकदम पॅरिस वगैरेला जातो.

ठिकाण इंटरनॅशनल असेल, पण दोन्ही मुलं -मुली डोमेस्टिक आहेत. स्थानिक आहेत. त्यामुळे त्यांचे लग्न येथेच होईल. आता आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आमची मुलं कुठं जाऊन काय करतील, हे सांगता येत नाही, असे पवार यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी उडाली.

महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न दोन वर्षे फसल्यानेच आता केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते वा त्यांच्या निकटवर्तीयांना लक्ष्य केले जात आहे वा भीती दाखविली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी भाजपवर केला.