सांगलीमध्ये जयंत पाटलांनी केला भाजपचा कार्यक्रम : राष्ट्रवादीचा केला महापौर

0
705

सांगली (प्रतिनिधी): सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादीने भाजपला जोरदार दणका दिला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाले. 

महापौर निवडणुकीसाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी मैदानात उतरले होते. भाजपचे सात नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या गळाला लागले होते. त्यामुळे सांगली महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार अशी दाट शक्यता होती. सकाळी ११ वाजता कोरोनामुळे ऑनलाईन मतदान घेण्यात आले. त्यात भाजपाची पाच मते फुटली. या पाचही नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले.

भाजपचे विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम आणि नसीमा नाईक या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग सूकर झाला.दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ मते पडली. भाजपच्या धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली. दिग्विजय सूर्यवंशी यांनी धीरज सूर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मत फुटली तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले.

सांगली महापालिकेत भाजपकडे ४३ काँग्रेस १९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ नगरसेवक आहेत. तरीही महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे पारडं जड होते. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री विश्वजित कदम यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. अखेर जयंत पाटलांनी आपल्या होमग्राऊंडमध्ये दमदार खेळी करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार धक्का दिला.