गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत जयंत पाटलांचा ‘मोठा’ खुलासा

0
160

मुंबई (प्रतिनिधी) : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यामधील सचिन वाझे यांचा कथित सहभाग या मुद्द्यांवरून विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरल्याने ठाकरे सरकारची कोंडी झाली होती. परिणामी गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.

अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून व्यवस्थित कारभार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा कोणताही विषय पक्षासमोर नाही, त्यामुळे यावरून वावड्या उठवण्याची गरज नाही, असे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

दरम्यान, मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक होत आहे. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तासभर चर्चा केली. या बैठकीत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अंतिम निर्णय शरद पवारच घेणार आहेत. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.