शेणगावच्या जंगलात आढळले ‘जारूळ’ राज्यफूल…

0
610

गारगोटी (प्रतिनिधी) : प्राईड ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे ‘जारूळ’ हे  महाराष्ट्राचे राज्य फूल शेणगावच्या जंगलाच्या डांबरी रस्त्याला आढळून आले. याबद्दल निसर्गमित्र, वनसंशोधक दत्ता मोरसे, सुभाष माने व इंद्रजीत मराठे यांनी समाचन व्यक्त केले. अद्भूत, आश्चर्यकारक अनुपम सौंदर्य लाभलेले हे जारूळ राज्य फूल घनदाट जंगलाच्या परिसरात आढळल्याने आम्ही भारावून गेलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

जंगल अभ्यासक दत्ता मोरसे म्हणाले की, मी सतत मोठ्या जंगलात फिरत असतो, मात्र हे राज्य फूल भुदरगडच्या पश्चिम घाटमाथ्याच्या पाटगांव, रांगणा आदी परिसरात आजवर मला आढळले नव्हते ते या शेणगांवच्या जंगल परिसरात आढळल्याने विकसित जंगलाची परिपूर्णता माझ्या लक्षात आली आहे. या फूलास जारूळ अथवा बोंडारा असेही म्हणतात. बहुतांश लोकांना हे राज्यफूल माहिती नाही. जांभळ्या रंगाची ही फूले लक्षवेधी आहेत. अंदाजे १०० फूट उंचीपर्यंत हा वृक्ष वाढतो. सागाच्या झाडाइतका हा टणक वृक्ष आहे.याचे लाकूड लालसर, टिकाऊ चमकदार असते. घरबांधणी, होड्या, जहाज बांधणी, रेल्वे वॅगन अशा अनेक कारणासाठी ते वापरतात. भरपूर पावसाच्या प्रदेशात हा वृक्ष आढळतो. या वृक्षाचे शास्त्रीय नांव लँजिस्ट्रोमिया असे आहे. लिट्रेसी किंवा मेंदी कुळातील या वृक्षास जारूळ, तामण, बोंडारा, बोंद्रा, बुंद्रा अशाही नावाने ओळखले जाते. भारतीय उपखंडातील जंगली फूल म्हणून या फुलाची विशेष ओळख आहे.

ताप आल्यास या झाडाच्या सालीचा काढा घेतला जातो. तोंड आलेल्या माणसाला या वृक्षाचे फळ आतून लावले जाते. याच्या फळात हायपोग्लिसेमिक नावाचे द्रव्य आहे. ते मधुमेहावर गुणकारी आहे. पोटदुखी व वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या वृक्षाचे महत्त्व ओळखून देशातल्या वनस्पतीशास्त्रातील संशोधकांनी या जारूळ वृक्षास ‘प्राईड ऑफ इंडिया’ असे म्हटले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदी-नाल्यांच्या काठाने तर रत्नागिरी व विदर्भातही ही झाडे काही ठिकाणी दिसून येतात.