नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवर्षी १६ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) केली. पंतप्रधानांनी देशातील १५० स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधताना उद्योजकांचे, कल्पक तरुणांचे अभिनंदन केले.

यावेळी ते म्हणाले की, नव उद्योजक स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत. त्या सर्व स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहचण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

यावेळी कृषी, आरोग्य, उद्योजक, अवकाश, उद्योग, सुरक्षा, तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स या संवादात सहभागी झाले होते. या स्टार्टअप्सची ६ कार्यकारी गटांमध्ये विभागणी केली गेली होती. स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात, यावर यावेळी चर्चा करण्यात आली.