कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशभक्त रत्नाप्पा कुंभार जनता सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर स्टोअर (जनता बाजार) या संस्थेमध्ये झालेल्या गैरव्यवहार आणि अपहाराची तक्रार करूनही सहकार विभागाकडून चौकशीस टाळाटाळ होत आहे, असा आरोप संचालक बोंद्रे, वैभव पवार, रविकिरण चौगुले, तानाजी साजणे, मधुकर शिंदे या संचालकांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत केला. सहकार विभागाने जनता बाजारचे दप्तर जप्त करून गैरव्यवहाराची चौकशी आणि कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

 

 

या वेळी सुहास बोंद्रे म्हणाले की, संस्थेच्या कारभाराबद्दल माझ्यासह तानाजी साजणीकर, रविकिरण चौगुले या संचालकांनी १० ऑगस्ट २०२० रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. संचालक मंडळाच्या फेब्रुवारी २०२० ते जुलै २०२०  या कालावधीत झालेल्या बैठका, इतिवृत्त, सही रजिस्टर याची साक्षांकित व छायांकित प्रतीची मागणी केली होती. त्यानुसार ही माहिती त्वरित द्यावी, असा आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी संस्थेला १९ ऑगस्ट रोजी दिला होता. मात्र आजअखेर ही माहिती देण्यात आलेली नाहीये.  माहिती द्यावी असे आदेश दिले होते. पण सहा महिने झाले तरी संस्थेने माहिती दिली नाही.

त्यानंतर १८ ऑगस्ट २०२० रोजी मी गैरव्यवहार, गैरव्यवस्थापन व अपहार या संदर्भात सविस्तर निवेदन साहाय्यक निबंधक, कोल्हापूर जिल्हा उपनिबंधक, सहकारमंत्री विधी,  न्याय विभागाचे सचिव, सहकार आयुक्त,  जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही देण्यात आले आहे. सहकारमंत्र्यांनी १२ नोव्हेंबर २०२०  रोजी  जिल्हा उपनिबंधक यांना जनता बाजार संस्थेच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी असे आदेश देऊन त्याचा शासनाला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तरीही जिल्हा उपनिबंधकांनी आणि शहर उपनिबंधकांनी वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे. त्यांनी संस्थेचे दप्तर जप्त करून त्याद्वारे चौकशी करून शासनाला अहवाल सादर करावा, अशी आमची मागणी आहे.