गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ओबीसी समाजाला आरक्षण  देण्याच्या मागणीसाठी गडहिंग्लजमध्ये  माजी आमदार श्रीपतराव शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे म्हणाले की, भारत देश अठरापगड जातींनी बनला आहे. त्यांची विभागणी विविध धर्मात झाली आहे.  देशातील सर्व ओबीसी समाजाचे सर्वेक्षण करावे, यासाठी देशाचे माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग नेमला होता. या मंडल आयोगाचा अहवाल आज बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. तरी नोकरी, शिक्षण, राजकरण यामधील आरक्षण ओबीसी समाजाला मिळाले पाहिजे.  या बाबत  केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन आरक्षण द्यावे, अन्यथा, जनता दल उग्र आंदोलन करेल, असा इशारा शिंदे यांनी दिला.

मागण्याचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाचे शिरस्तेदार जीवन क्षीरसागर यांनी स्वीकारले.  या आंदोलनमध्ये जनता दलाचे तालुका अध्यक्ष बाळेश नाईक, नगराध्यक्षा स्वाती कोरी आदीसह जनता दलाचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.