कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिल रायडर्सतर्फे दरवर्षी पन्हाळा ते पावनखिंड मोहीम काढली जाते. त्यांनी काढलेली पहिली मोहीम उत्साहात यशस्वी झाली. या मोहिमेत पाचशेहून अधिक अबालवृद्धांनी सहभाग नोंदवला होता. तर जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेवच्या जयघोषाने पावनखिंड परिसर दणाणून गेला होता.

तसेच पन्हाळगडावरून सुरू झालेली मोहीम आंबेवाडी येथे मुक्काम करून पांढरे पाणीमार्गे दुपारी पावनखिंडीमध्ये पोहोचली. पावनखिंडीमध्ये नरवीर बाजीप्रभू, फुलाजी प्रभू व शूरवीर मावळ्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांचे हस्ते पूजन करण्यात आले. तर उपस्थितीतांना  ध्येयमंत्र प्रेरणामंत्र देण्यात आला. छत्रपती शिवराय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेवच्या जयघोषाने सारा परिसर शिवमय झाला होता. सदर मोहिमेमध्ये आठ वर्षापासून साठ वर्षापर्यंतचे शिवभक्त सहभागी झाले होते.

या मोहीमेत प्लास्टिक नाकारण्याचा निश्चय या विषयासाठी समर्पित केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून व बाहेरील राज्यातून पाचशेच्यावर सहभागी झालेल्या युवक युवतींद्वारे प्लास्टिक मुक्तीची कृती आणि जागृती करण्यात आली.

या मोहीमेत संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष युवराज साळुंखे, प्रताप माने, सुरज डोली, सागर डकरे, सचिन नरके, अवधूत पाटील, प्रसाद कदम, संतोष कदम, वैभव जाधव, विनायक कालेकर, मयूर लवटे आदींनी सहभाग नोंदवला होता.