नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या १६ व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड यांचा अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय झाला. ७१ वर्षीय धनखड यांना पाहिल्या पसंतीची तब्बल ५२८  तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२  मते मिळाली. १५  मते बाद झाली. शनिवारी झालेल्या मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर धनखड निवडून आल्याचे घोषित करण्यात आले.

लोकसभा महासचिव उत्पलकुमार सिंग यांनी आज रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी धनखड यांच्या विजयाची घोषणा अधिकृतरीत्या केली. त्यांच्या विजयामुळे लोकसभा व राज्यसभेचे पीठासीन अधिकारी एकाच राज्यातील (राजस्थान) असल्याचा, उंबराच्या फलासारखा दुर्मीळ योगायोग जुळून आला आहे. वर्तमान लोकसभा सभापती ओम बिर्ला हे कोटाचे खासदार असून धनखड यापूर्वी झुनझुनूतून संसदेवर (लोकसभा) निवडून आले होते. १९७४ पासून सुरू असलेल्या धनखड यांच्या सार्वजनिक जीवनाची यात्रा उपराष्ट्रपतीपदापर्यंत येऊन ठेपली. धनकड यांच्या रूपाने आणखी एका ओबीसी नेत्याला उपराष्ट्रपतीपदाचा मान मिळाला आहे.

मार्गारेट अल्वा यांना विरोधी पक्षांमध्ये एकजूट नसल्याचा फटका सहन करावा लागला आणि त्यांचा पराभव झाला. २०२२ च्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी १० वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ७२५ खासदारांनी मतदान केले. शनिवारी झालेल्या मतदानात सुमारे ९३  टक्के खासदारांनी मतदान केले, तर ५५ खासदारांनी मतदान केले नाही. या ५५ गैरहजर खासदारांपैकी ३४ टीएमसीचे, भाजप-एसपी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २ आणि बसपचे एक खासदार आहेत.

३६ खासदार असलेल्या तृणमूल काँग्रेसने निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र शुभेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी आणि दिव्येंदू अधिकारी यांनी मतदान केले, म्हणजेच ३४ टीएमसी खासदारांनी मतदान केले नाही. भाजपच्या दोन खासदारांनी मतदान केले नाही. सनी देओल आणि संजय धोत्रे यांनी मतदान केले नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांना मतदानही करता आले नव्हते.