बाचणी (प्रतिनिधी) : बाचणी येथील जाधव कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. ना. मुश्रीफ यांनी घरी भेट देत कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने त्यांनी कु. भक्ती जाधव या लहान मुलीसाठी एक लाखांची मदतही जाहीर केली.

काल (मंगळवार) सकाळी कागल तालुक्यातील बाचणी येथे कपडे धुण्यासाठी गीता जाधव आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन जाधव गेले होते. यावेळी उच्च दाबाची वीजवाहिनी अंगावर पडून या मायलेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामध्ये भक्ती ही अवघ्या आठ वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली होती.

ना. मुश्रीफ यांनी, डगमगून जाऊ नका तुमच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी ठामपणे उभा असल्याचे सांगितले. तसेच महावितरणचे अधिकारी उदगावा यांना फोन करून या कुटुंबाला महावितरणकडून जास्तीत-जास्त मदत मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

यावेळी कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, सरपंच इक्बाल नायकवडी, प्रकाश पाटील, दत्ता पाटील, सुभाष चौगुले आदी उपस्थित होते.