‘त्यांनी’ खोट्या सभासदांच्या जिवावर राजाराम कारखान्यात बोगस कारभार केला : जे. एल. पाटील

0
185

कसबा बावडा (प्रतिनिधी) :  ‘त्यांनी’  १३४६ खोट्या, बोगस सभासदांच्या जिवावर मागील २०-२५ वर्षे छत्रपती राजाराम साखर कारखान्यात बोगस कारभार करून बोगस राजकारण केले, असा आरोप उद्योगपती जे. एल. पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता केला. त्याचप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी आजचा निकाल पाहून नैतिकता म्हणून कारखान्याची निवडणूक लढवू नये असे आवाहनही केले. ते आज (गुरुवार) पालकमंत्री सतेज पाटील गटाच्या वतीने कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत त्यांनी छ. राजाराम साखर कारखान्यातील १३४६ सभासदांच्या अपात्रतेचा आदेश नुकताच दिला. त्यांनी तत्कालीन प्रादेशिक सहसंचालक अरुण काकडे यांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी दिलेला आदेश कायम ठेवला. या निर्णयामुळे महाडिक गटास मोठा धक्का तर पालकमंत्री सतेज पाटील गटास दिलासा मिळाला आहे. सहकारमंत्री पाटील यांच्या निर्णयासंदर्भात माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

या वेळी सोसायटीचे सभापती धनाजी गोडसे, उपसभापती संतोष ठाणेकर, माजी नगरसेवक मोहन सालपे, अजित पोवार, तानाजी चव्हाण, रवी रेडकर, जयसिंग ठाणेकर, कुंडलिक परीट, प्रमोद पाटील, नाना उलपे आदी उपस्थित होते.